राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील १७ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आर्थर रोड तुरुंगात करोनाची लागण झालेल्या कैद्यांची संख्या वाढत असल्याची दखल घेत राज्य सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने राज्यभरातील ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची सुटका करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण सुमारे साडे सतरा हजार (१७,५००) कैदी व कच्च्या कैद्यांना तात्पुरत्या सुटकेचा दिलासा मिळणार आहे.

राज्यभरातील सर्व प्रकारच्या तुरुंगांमध्ये एकूण सुमारे ३५ हजार २०० कैदी व कच्चे कैदी आहेत. त्यापैकी ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचा निर्णय समितीने या बैठकीत घेतला. आजपर्यंत पाच हजारहून अधिक जणांची अंतरिम जामिनावर तर सुमारे सहाशे जणांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. समितीच्या निर्णयानुसार उर्वरित सुमारे १२ हजार कैदी व कच्च्या कैद्यांचीही येत्या काही दिवसांत सुटका होणार आहे.

तुरुंगांमधील गर्दी कमी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २३ मार्च रोजी दिले होते. त्याअनुषंगानेच राज्य सरकारने निकष निश्चित करण्यासाठी ही उच्चाधिकार समिती नेमली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमजद सय्यद, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संजय चहांदे आणि पोलिस महासंचालक (कारागृह) एस. एन. पांडे यांचा समावेश असलेल्या या उच्चाधिकार समितीने सध्याची एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारच्या आपल्या पुढील बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

Leave a Comment