राज्यस्तरीय कबड्डी : कराडातील स्पर्धेत बाचणीचा जय हनुमान क्रीडा संघ विजेता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अटीतटीच्या अंतिम सामन्यात आष्टी (जि. बीड) येथील धसदादा स्पोर्ट्स संघाला पराभूत करून बाचणी (जि. कोल्हापूर) येथील जय हनुमान क्रीडा मंडळाच्या संघाने प्रथम क्रमांकाचे 51 हजार एक रुपये व चषक पटकावला. स्पर्धेत धस दादा स्पोर्ट्स संघाला दुसऱ्या क्रमांकाचे 31 हजार एक रुपये व चषक मिळाला. कौलव येथील शिवमुद्रा संघाने तिसऱ्या क्रमांकाचे 21 हजार एक तर कळंब येथील राणाप्रताप संघाने चौथ्या क्रमांकाचे 11 हजार एक रुपये व चषक पटकावला. स्पर्धेत वैयक्तिक बक्षिसेही देण्यात आली.

कराड येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर गेल्या दोन दिवसापासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. स्पर्धेत काल रात्री उशिरा अंतिम सामना झाला. सामना पाहण्यासाठी कबड्डी शौकिनानी मोठी गर्दी केली होती. आष्टी येथील धसदादा स्पोर्ट्स व बाचणी येथील जय हनुमान क्रीडा मंडळ या संघांमध्ये अंतिम सामना झाला. शेवच्या सेकंदापर्यंत उपस्थितांना श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना ठरला. गुणाचा फलक हलता राहिल्याने सामन्यातील नेमका विजेता संघ कोण होणार ? याचा अनेकांना अंदाज बांधणे अवघड झाले होते. कधी आष्टी संघ वरचढ तर कधी बाचणी संघाची गुणात आघाडी घेत असल्याने सामना रोमहर्षक अवस्थेत पोहोचला होता. अखेरच्या क्षणापर्यंत या सामन्यात विजेते कोण होणार ? याची उपस्थितांना उत्सुकता लागून होती. अखेर बाचणी येथील जय हनुमान क्रीडा मंडळाने अवघ्या दोन गुणांची आघाडी घेत धसदादा स्पोर्ट्स संघाला पराभूत करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर धसदादा स्पोर्ट्स संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

तिसऱ्या क्रमांकासाठी कौलव येथील शिवमुद्रा संघ व कळंब येथील राणाप्रताप संघात लढत झाली. ही लढतीतही चुरशीची झाली. त्यामध्ये शिवमुद्रा संघाने राणाप्रताप संघाला पराभूत करून तिसरा क्रमांक पटकावला. तर राणाप्रताप संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत धसदादा स्पोर्टसच्या संदेश देशमुख यास उत्कृष्ट पकड, शिवम पांढरे यास उत्कृष्ट चढाई तर बाचणी येथील जय हनुमान संघातील निखिल जाधव यास उत्कृष्ट खेळाडू व इस्लामपूर येथील इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या संघाला उत्कृष्ट व आदर्श संघ म्हणून वैयक्तिक पुरस्कार बक्षिसे देण्यात आली. लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, उपाध्यक्ष अरुण जाधव, सचिव रमेश जाधव, नंदकुमार बटाणे, अँड. मानसिंगराव पाटील, मुनीर बागवान, काशिनाथ चौगुले, भास्कर पाटील, विजय गरुड,राजेंद्र जाधव, सचिन पाटील, दादासाहेब पाटील आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

Leave a Comment