हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या सामाजिक कामासाठी प्रसिद्ध आहेत. अपंग बांधवांच्या मदतीसाठी बच्चू कडू सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. तसेच बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने अनेक रक्तदान शिबीरे झाली आहेत. बच्चू कडू स्वतः रक्तदान करतात. त्यांनी आतापर्यंत 97 वेळा रक्तदान केले आहे. आता या सर्व सामाजिक कामात अजून एका लक्षवेधी घटनेची भर पडली आहे. ती म्हणजे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सपत्नीक रक्त तुला केली आहे. जवळपास 156 बाटली रक्त या रक्ततुलेत देण्यात आले आहे. आतापर्यंत पुस्तक, लाडू किंवा इतर अशाप्रकारच्या गोष्टींची तुला आपण ऐकली असेल पण रक्ततुला होण्याची ही पहिलीच घटना असावी. अमरावतीच्या अचलपूर मतदार संघातील चांदूर बाजारात रक्त तुला करण्यात आली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस रक्तदान करुन नामांकन अर्ज दाखल केला होता. तर, मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देखील त्यांनी रक्तदान केले होते. तसेच, मंत्रालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीही रक्तदान केलं होतं. त्यामुळे चांदुर बाजारमधील ज्ञानोदय महाविद्यालयात बच्चू कडू यांचा त्यांच्या पत्नीसह सपत्नीक सत्कार आणि रक्त तुला करण्यात आली. बच्चू कडू यांची रक्ततुला राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. बच्चू कडू यांच्या या समाज उपयोगी पुढाकाराचे कौतुक होत आहे.