ठाकरे सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार 3700 कोटी होणार जमा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची लवकरच भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जाणार असून त्याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर जिल्ह्यातील सुमारे 55 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पहिल्या टप्प्यात 3 हजार 700 कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी ७०% नुकसान हे मराठवाडा विभागात झाले आहे. त्यामुळे मदतीचा पहिला टप्पा हा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्राधान्याने वर्ग करण्यात येत आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा लवकरात लवकर मदत देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांवरील संकट मोठं असलं तरी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या पैश्याची मदत होवून आधार मिळावा हा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून २ हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी १० हजार कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, असे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्विट करीत म्हंटले आहे.

You might also like