कराड | बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ग्रामविकास अधिकारी विलास देसाई यांच्या मनमानी कारभारा विरोधात सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. ग्रामविकास अधिकारी देसाई यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, बेलवडे बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी विलास देसाई हे कामावर उपस्थित राहत नाहीत. त्यांची कामावर येण्याची व जाण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे ग्रामस्थांची कार्यालयीन कामे अपूर्ण आहेत. सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी नवीन योजनांबद्दल विचारणा केल्यास याबाबत कोणतीही माहिती देसाई यांच्याकडून दिली जात नाही. मासिक सभेत ठरलेली कामे केली जात नाहीत. सर्वांशी उद्धटपणे बोलत आहेत. तसेच उपोषणाला बसा; माझ कोणीही वाकड करु शकत नाही, असा दम दिला जात आहे.
तसेच गावातील मोबाईल टॉवरच्या कामाबाबत देसाई यांनी दिलेला ना हरकत दाखला व त्या कामाबाबत संबंधितांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे देसाई यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन निवेदन सादर केले आहे. तरी मनमानी कारभार करणार्या ग्रामविकास अधिकारी विलास देसाई यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रदिप मोहिते यांचा उपोषणाचा इशारा
ग्रामपंचायतीमध्ये देसाई यांचा मनमानी कारभार चालू आहे. त्याचा विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच प्रदिप मोहिते या ग्रामस्थाने माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याबाबत मोहिते यांनी उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला आहे.