कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपालिकेत वारसा हक्काने बेकायदेशीरपणे कुटुंबात न राहणाऱ्या व्यक्तीची नेमणूक, पालिकेचे अंकाऊंट विभागातील कर्मचारी रवि ढोणे यांच्या कारभाराची चाैकशी, स्वच्छ सर्वेक्षणात बाल कामगारांचा वापर आणि माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निधीत ठेकेदारांकडून भ्रष्टाचार यासंबधी वारंवार पाठपुरावा करून कारवाई होत नाही. तेव्हा येत्या 13 जून 2022 पर्यंत या विषयी ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा राष्ट्रीय सुशिक्षीत बरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्यावतीने प्राणांतिक उपोषणचा इशारा जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड नगर पालिकेने कै. सतिश पांडूरंग भिसे यांच्या निधनानंतर वारस हक्काने लाड / पागे परिपत्रकानुसार कुटुंबात न राहणाऱ्या व्यक्तीची बेकायदेशीर नेमणूक करुन शासकी परिपत्रकाचे अवमुल्यंन केले त्याची दुरुस्ती करुन कुटुंबातील सदस्यांची संमत्ती घेवून पुन्हा नेमणूक करावी. कराड नगरपालिकेचे अकाऊंट विभागातील कर्मचारी रवि ढोणे यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी. कारण त्यांचा कारभार संशयास्पद आहे. याबाबत वारंवार निवेदन देवून चौकशीची मागणी करुनही कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे.
कराड नगरपालिकेने आरोग्य विभागामार्फत स्वच्छ सर्वेक्षण कामामध्ये बाल कामगारांचा वापर होत असल्याचे पुरावे देवूनही ठेकेदारावर व संबंधीत आरोग्य अभियंत्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेला, विशेष रस्ता अनुदान यामधून 11 कोटी रुपये दिले होते. त्याकामात भ्रष्टाचार झाल्याबाबत अनेकदा तक्रारी देवूनही संबंधीत अभियंता, उपअभियंता व ठेकेदार त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. प्रकरण गंभीर स्वरुपाचे असुनही ‘आपण दोघे भाऊ भाऊ मिळेल ते वाटून खाऊ’ असा प्रकार झालेला आहे. त्याची चौकशी व्हावी.
वरील सर्व बाबींचा विचार करुन त्वरीत कारवाई करावी, अन्यथा दि. १३/०६/२०२२ पासून आपल्या कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला, सचिन भिसे कराड तालुका अध्यक्ष व अन्यायग्रस्त महिला श्रीमती. राधाबाई पांडुरंग भिसे (वय-60), कै. सतीश पांडुरंग भिसे यांच्या मातोश्री हे सर्व प्राणांतीक उपोषणाला सुरुवात करणार आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांची स्वाक्षरी आहे.