हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमधील T20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यानंतर राहुल द्रविडचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. द्रविडनंतर व्ही व्ही एस लक्ष्मण, गौतम गंभीर, स्टिफन फ्लेमिंग आणि जस्टिन लँगर यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वात स्टिफन फ्लेमिंगची दावेदारी मजबूत वाटत आहे. सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या स्टीफन फ्लेमिंगला (Stephen Fleming) राहुल द्रविडचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून BCCI विचार करत आहे. स्टिफन फ्लेमिंगची चतुर बुद्धिमता, प्रशिक्षक म्हणून त्याचा दांडगा अनुभव हि त्याची जमेची बाजू आहे. परंतु त्याला 27 मे पर्यंत प्रशिक्षक पदासाठी अर्ज करावा लागेल.
फ्लेमिंगकडे दांडगा अनुभव – Stephen Fleming
रिपोर्टनुसार, 2009 पासून चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक असलेले फ्लेमिंग यांच्याकडे द्रविडच्या जागी योग्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. फ्लेमिंग भारतीय संघाचा कोच झाला तर त्यांच्या अनुभवामुळे भारतीय संघात मोठे बदल घडू शकतात असं बीसीसीआयला वाटत आहे. तसेच प्रशिक्षक पदाच्या प्रदीर्घ अनुभवामुळे कोणतीही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याचा अनुभव फ्लेमिंगकडे (Stephen Fleming) आहे. स्टीफन फ्लेमिंग 2009 पासून चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांनी चार वर्षे बिग बॅशमध्ये मेलबर्न स्टार्सचे प्रशिक्षकपद भूषवले. CSK व्यतिरिक्त, तो SA20 मध्ये Joburg सुपर किंग्ज आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्जचा मुख्य प्रशिक्षक देखील आहे. या दोन्हीही CSK च्याच फ्रँचायझी आहेत. याशिवाय द हंड्रेडमध्ये तो सदर्न ब्रेव्हचा मुख्य प्रशिक्षकही आहे. एकूणच पाहता कोचिंगचा मोठा अनुभव असून तो टीम इंडियाच्या कामी पडेल.
गंभीर, लक्ष्मणचाही पर्याय –
स्टीफन फ्लेमिंग शिवाय, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि जस्टिन लँगर यांचीही नावे आघाडीवर आहेत. लक्ष्मण गेल्या तीन वर्षांपासून एनसीएचे प्रमुख म्हणून काम करत आहे. भारत अ आणि अंडर-19 संघही त्याच्या देखरेखीखाली आहेत. द्रविडच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचीही भूमिका बजावली आहे. तर दुसरीकडे गौतम गंभीर सुद्धा चांगला पर्याय आहे. आपल्या नेतृत्वाखाली त्याने कोलकात्याला दोनदा आयपीएल चॅम्पियन बनवले होते आणि मागील दोन हंगामात लखनौला प्लेऑफमध्ये नेले. गंभीरचे व्यवस्थापन कौशल्य उत्कृष्ट आहे. आताही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सचा संघ दमदार कामगिरी करत आहे.