डोळ्यात मिर्चीची पूड फेकून एक लाखाची रक्कम असलेली बॅग केली लंपास

औरंगाबाद | सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील बस स्थानकावर एका चोरट्याने नोकराच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून एक लाखाची बॅग लंपास केली आहे. सोमवारी 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्येएकचखळबळउडाली आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, दीपक महाजन यांचे भराडी येथील घाटनांद्रा चौकात वैभव ट्रेडर्स नावाचे सिमेंट आणि लोखंडाचे दुकान आहे. या दुकानावर शेख हकीम (कालू ) शेख जिलानी हा कामावर आहे. तो सोमवारी 3 वाजेच्या सुमारास एका बँकेत जाऊन त्याने एक लाख रुपये काढले. दरम्यान ती पैश्याची बॅग दुकानावर घेऊन जात असताना रस्त्यातच चोरट्यानी दुचाकीवर येऊन त्याला अडवले आणि त्याच्या डोळ्यात मिर्चीची पूड फेकून त्याच्या हातातून पैश्याची बॅग चोरट्यानी पळवून नेली.

भराडी येथील बसस्थानाकावर सतत नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी असताना तो चोरटा भरदिवसा बॅग घेऊन पसार झाल्याने उपस्थित नागरिक देखील अवाक झाले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, विठ्ठल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत विचारपूस केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असून काल रात्री पर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.