हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरूवात होत आहे. या काळामध्ये तुम्ही जर देशभरातील प्राचीन आणि प्रसिद्ध दुर्गादेवीच्या मंदिरांना भेट दिली तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल. त्यामुळे तुम्हाला हे माहित असायला हवे की, उत्तर भारतातील माता वैष्णवी देवी ते कांगडा देवी आणि ज्वाला देवी ते दक्षिण भारतातील मीनाक्षी देवीपर्यंत 52 शक्तीपीठे आणि अद्वितीय अशी मंदिरे आहेत. मात्र, भारतात असे एक मंदिर आहे, ज्याठिकाणी देवीला फुल किंवा प्रसाद अर्पण करण्याऐवजी दगड अर्पण केले जातात.
छत्तीसगडमधील बिलासपूर शहरात वनदेवी मंदिर आहे. या मंदिरातील देवीला फुल प्रसाद अर्पण करण्याऐवजी दगड अर्पण केले जातात. याबाबत स्थानिकांची अशी भावना आहे की, या देवीला दगड खूप आवडतात त्यामुळे जे कोण भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात, ते सोबत दगड गोटे घेऊन येतात आणि हे दगड देवीला अर्पण करतात. देवीला दगड अर्पण करण्याची प्रथा बिलासपूर गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या प्रथेमागे भाविकांची श्रद्धा देखील तितकीच आहे. त्यामुळे प्रत्येक भाविक याठिकाणी देवीला अर्पण करण्यासाठी येताना पाच दगड घेऊन येतो.
समोर आलेल्या माहितीनुसार, वनदेवी मंदिराचा इतिहास शंभर वर्ष जुना आहे. या मंदिरामध्ये देवीची मूर्ती कोणी बसवली ती कधी आली हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांपूर्वी देवीची ही मूर्ती एका झाडाखाली ठेवलेली होती. ज्यावेळी भाविकांनी या मूर्तीला पाहिले त्यावेळी तुझ्यासाठी छोटेसे असे वनदेवी मंदिर स्थापित करण्यात आले. ही देवी जंगलात सापडल्यामुळे या देवीला शेतातील दगड गोटे अर्पण केले जातात. असे मानले जाते की, या देवीला पाच दगड अर्पण केल्यानंतर आणि तिचे मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कारणामुळेच आजही वनदेवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक जात असतात.