कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना राज्यात अनेक ठिकाणी लालपरी सुरू झाली आहे. आटपाडी ते कराड बसवर सुर्ली घाटात (ता. कराड) अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीने कर्मचाऱ्यांच्या संपाला पहिल्यांदा गालबोट लागले आहे. याप्रकरणी बस कराड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आणली होती. अद्याप गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील आटपाडी आगारातून निघालेली बसवर (क्र. एमएच -14- बीटी- 3695) कडेगाव येथून पुढे आल्यानंतर सुर्ली घाटात दगडफेक झाली आहे. बस कराडकडे येत असताना पाठिमागून दगडफेक केली असल्याची माहिती वाहक अमोल वाघमारे यांनी माहिती दिली. दगडफेकीत कोणत्याही प्रवाशास दुखापत झालेली नाही.
आज सातारा जिल्ह्यातील बससेवा सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील आटपाडी आगारतही बससेवा सुरू झालेली आहे. मात्र कराडकडे येत असताना बसवर दगडफेक केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संपाला गालबोट लागले आहे. कराड तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.