आडलेल्या वारकऱ्यांना मदत करणारे डॉ. दानिश खान झाले सोशल मीडियाचे हिरो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संगमनेर प्रतिनिधी | जात आणि धर्म यांच्या पलीकडे मानवता हा एक विशाल धर्म असतो. याचाच प्रत्येय काल संगमनेर येथे आला. गाडी बंद पडलेल्या वारकऱ्यांना मदत करणारे आणि आपल्या रक्त संबंधातल्या पाहुण्या एवढा पाहुणचार करणारे डॉ. दानिश खान हे सोशल मीडियाचे हिरोच बनले आहेत.

पैठण येथील काही वारकरी शिर्डीमार्गे देहू आळंदी करून पंढरपूरला जाणार होते. त्यादरम्यान त्यांची गाडी संगमनेर जवळ बंद पडली. सायंकाळची वेळ असल्याने वारकऱ्यांचा चांगलाच खोळंबा झाला होता. त्यानंतर गाडी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीने देखील गाडी दुरुस्त होण्यास बराच वेळ लागेल. तुम्हाला आज इथंच मुक्काम करावा लागेल असे सांगितले. त्यानंतर वारकऱ्यांनी मुक्कामाचे ठिकाण शोधण्यास सुरुवात केली. संगमनेर येथे असणाऱ्या एका मंदिरात मुक्काम करण्याचे नियोजन त्यांनी आखले मात्र त्या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम सुरु असल्याने त्यांची पुन्हा निराशा झाली.

एका घराच्या ओसरीला थांबलेले हे वारकरी काम आटपून आपल्या हॉस्पिटल मधून बाहेर पडणाऱ्या डॉ. दानिश खान यांना दिसले. त्यानंतर त्यांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये रिकाम्या असणाऱ्या कॉटवर आपण झोपाल का असे त्यांनी नम्रपणे वारकऱ्यांना विचारले. तेव्हा त्या वारकऱ्यांनी होकार दिला. डॉक्टरांनी महिला वारकऱ्यांची व्यवस्था त्यांच्या हॉस्पिटलमध्ये केली. तर पुरुष वारकऱ्यांची व्यवस्था शेजारी असणाऱ्या हॉलमध्ये केली. सकाळी त्यांना नाश्ता आणि चहा देण्याचे काम देखील डॉक्टरांनी केले. तसेच या वारकऱ्यांना जेवण करवूनच यांनी पुढील प्रवासाला रवाना केले. या वारकऱ्यापैकी एका वारकऱ्याने डॉक्टरांवर पोस्ट लिहिली. त्यानंतर ती पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्याने डॉक्टर सोशल मीडियाचे हिरो झाले आहेत.

Leave a Comment