कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या मतमोजनीस येथील वखार महामंडळाच्या गोदामातून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अनुसूचित जात जमाती वर्गातील उमेदवारांसाठी झालेल्या मतांची मोजणी केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर मतमोजणी केंद्र परिसरातील वाहतूकीतही बदल करण्यात आला असून केंद्र परिसरात कलम १४४ लागू केले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी माहिती दिली.
कराड कार्वे मार्गावर असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ठीक नऊ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. ७४ टेबलवरून कर्मचाऱ्यांद्वारे दोन फेर्यात हि मतमोजणी केली जात आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत वडगाव – हवेली, काले – कार्वे आणि नेर्ले – तांबवे या कारखाना गटातील 74 मतदान केंद्राची मतमोजणी सुरू आहे. राजकीयदृष्टया महत्वाच्या असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कोण बाजी मारणार व कोण पराभूत होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनानेही मतमोजणी केंद्र परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच संवेदनशील अशा गावांमध्ये कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांकडून लक्ष ठेवले जात आहे. तर मतमोजणी केंद्र परिसरातील १०० मीटर परिसरात संचारबंधी ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत होत आहे.