रेखा जरे हत्या प्रकरणात मोठा खुलासा; नगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठेंनी दिली होती खुनाची सुपारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणात अहमदनगर पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांनीच रेखा जरे यांची हत्या घडवून आणली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बोठे यांच्या विरोधात पुरावे मिळाल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधिक्षक, मनोज पाटील यांनी दिली आहे. बोठे फरारी असून अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. घराची झडती घेतली असून, काही वस्तू जप्त करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता, सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार यांची नावे समोर आली. या दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. या पाच जणांकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. तसे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बोठे यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

रेखा जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली आहे, हे मुख्य सूत्रधाराला पकडल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून सुपारीची रक्कम ६ लाख २० हजार रूपये जप्त केली आहे. ही सुपारीची रक्कम बोठे व भिंगारदिवे यांनी मिळून दिली होती, असेही पाटील यांनी सांगितले. आज न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या सर्व आरोपींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

काय आहे हे हत्या प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेर तालुक्यातील जातेगाव इथल्या घाटात हल्लेखोरांनी रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली होती. रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ४ वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली. मात्र 30 नोव्हेंबरला पुण्यातून आपलं काम आटोपून मुलगा आणि आईसोबत नगरकडे येत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा घाटात अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन रेखा जरे यांची हत्या केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’