Sunday, June 4, 2023

द्राक्ष बागायतदारांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेकडून जोरदार निदर्शने

सांगली । जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्ष बागांना सर्वाधिग फटका बसला. हातातोंडाला आलेल्या बागा उध्वस्त झाल्याने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या बागायतदारांना तातडीने मदत देण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खराब झालेल्या द्राक्षासह निदर्शने करण्यात आली. नियमित कर्जदार शेतकर्‍यांना जाहीर केलेली 50 हजार तात्काळ देण्याची मागणीही करण्यात आली.

सलग तिसर्‍या वर्षी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी धडपडत आहे. जिल्ह्यात प्रत्यक्षात कागदोपत्री 10 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. केवळ कागदोपत्री पंचनामे करून फार्स न करता तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. एकरी 4 ते 5 लाख रुपये प्रमाणे द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी पंचनामे करून सुद्धा अनेकांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. गतवर्षीची आणि यंदाची सरसकट नुकसान भरपाई मिळावी.

नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांसाठी ठाकरे सरकारने 50 हजार रुपये जाहीर केले आहेत. दोन वर्षे झाले तरीही अद्याप नियमित शेतकर्‍यांना न्याय मिळाला नसल्याची गंभीर बाब आहे. तसेच द्राक्ष बागायतदारांची सरसकट कर्जे माफ करुन द्राक्षबागायतदार पुन्हा जोमाने द्राक्ष शेती वाचवून सक्षम होण्यासाठी होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या विशेष पॅकेजची घोषणा करून द्राक्षबागायतदारांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी युवकचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.