एसटीचे चाके फिरू लागल्याने एसटीचे उत्पन्न सुरु

औरंगाबाद – संपावरून कामावर हजर झालेल्या चालक वाहकांच्या मदतीने धावणाऱ्या एसटी बस गाड्यांमुळे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न सध्या 3 लाखांपर्यंत गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी 8 नोव्हेंबर पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. संपाला आता एका महिन्याहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. एसटीच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न 40 ते 50 लाख रुपये आहे. परंतु संपामुळे रोज उत्पन्न बुडत आहे. मात्र, काही संपकरी कर्मचारी कामावर परतले आहेत त्यात यांत्रिकी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे. तर 20 चालक आणि 8 वाहक कामावर हजर झाले आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रोज 10 ते 12 बस धावत आहेत. त्याचबरोबर 10 ते 12 खाजगी शिवशाही बस ही पुणे मार्गावर धावत आहेत प्रवासी मध्यवर्ती बस स्थानकात येत आहेत. परंतु बहुतांश प्रवाशांना खासगी वाहनांचा रस्ता धरावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

दुसरीकडे अधिकारी मात्र दिवसभर आगारात ठाण मांडून बसत आहेत. रवाना होणार या बसला कोणीही विरोध करणार नाही या दृष्टीने पोलीस बंदोबस्तही ठेवला जात आहे.‌