पुणे प्रतिनिधी,मयूर डुमणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यभरात शिवभोजन केंद्र सुरू झाली आहेत. या केंद्रावर फक्त 10 रुपये दरात जेवणाची थाळी मिळणार आहे. अशाप्रकारचे शिवभोजन केंद्र फर्ग्युसन कॉलेजमध्येही सुरू करा या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. विद्यार्थ्यांनी विधानभवनात अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले.
पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठवाडा, विदर्भ यांसारख्या दुष्काळग्रस्त भागातुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. शहरात आल्यानंतर विविध समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. कित्येक विद्यार्थी एक वेळ वडापाव खाऊन आपला दिवस काढतात तेव्हा अशा गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात ‘ शिवभोजन’ योजनेचे केंद्र चालू करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थी संतोष रासवे, सुनील जाधव, पंकज साठे, दर्पण शिंदे, सुजित काटे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात हे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात शिवभोजन योजनेचे उद्घाटन झाले. शहरात अशी जवळपास सात केंद्रे चालू करण्यात आली आहेत. माफक दरात गरजूंना भोजन पुरवणे हा या योजनेचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या मागणीला उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.