औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आज सर्व विद्यार्थी संघटनांच्या वतीने वाढती महागाई व बेरोजगारी विरोधात हाल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेटचे’ पोस्टर हातात धरून विद्यार्थ्यांनी मोदी सरकारचा निषेध केला.
या मोर्चाद्वारे, प्राध्यापक भरती तात्काळ सुरू करण्यात यावी, राज्यसेवा परीक्षा वेळेत घेऊन जागा तात्काळ भरा, राज्य शासनाच्या सर्व आस्थापनातील रिक्त पदे कुठल्याच विलंब न करता भरण्यात यावेत, पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडरवरील दरवाढ मागे घ्यावी या मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात या पेक्षा तीव्र आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा इशाराही विद्यार्थी संघटनांनी यावेळी दिला.
या मोर्चामध्ये वा रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महेंगा तेल, हम अपना अधिकार मांगते नही किसीसे भिक मांगते, ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट, असे फलक हातात घेऊन आंदोलनात कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. तसेच मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेधही दर्शवला. या मोर्चाला प्रकाश इंगळे, लोकेश कांबळे, सत्यजित मस्के, केशव नामेकर, राहुल मकासरे, अमोल खरात, योगेश बहादुरे, जयश्री शिर्के, दीक्षा पवार, अमोल दांडगे आदीसह कार्यकर्ते व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.