औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील वैयक्तिक लाभाच्या बारा योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. परंतु जिल्ह्यातील तालुकास्तरीय पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे सदर योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे लाभार्थी वंचित राहत आहेत.
मागासवर्गीय समाजातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. यात औरंगाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे संगणक, झेरॉक्स, विद्युत मोटार, ऑइल इंजिन वाहन, चालक परवाना, पिठाची गिरणी, चार शेळ्या, गाय-म्हैस, मिरची कांडप,तुषार, पियूसी पाईप, आशा बारा योजनांसाठी 2020-21 वर्षाचा चार कोटी 12 लाख 26 हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान वैयक्तिक लाभाच्या बारा योजनांचे प्रस्ताव प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत.परंतु या योजनांची तालुका व गाव पातळीवर अधिकाऱ्यांच्या वतीने जनजागृती न झाल्याने सदर योजनांपासून लाभार्थी वंचित राहत असल्याचा आरोप समाज कल्याण सभापती मोनाली राठोड यांनी केला आहे. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही सभापती मोनाली राठोड यांनी केले आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजना व निधी
संगणक 60 लाख, झेरॉक्स 40 लाख, महिला झेरॉक्स 30लाख, विद्युत मोटार 40 लाख, ऑइल इंजिन 30लाख, वाहन चालक परवाना 40लाख, पिठाची गिरणी 30 लाख, चार शेळ्या एक बोकड 30 लाख, गाय म्हैस 30लाख, मिरची कांडप 30लाख, तुषार सिंचन 30लाख. या बारा योजनांसाठी 2020-21 वर्षाचा 4 कोटी 12 लाख 26 हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सर्व योजना 100 टक्के अनुदानित आहेत परंतु पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सदर योजनेचे प्रस्ताव लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत. दरम्यान सर्व बीडीओनी लवकरात लवकर प्रस्ताव मागवावेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांची या संदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात येईल. मोनाली राठोड, समाज कल्याण सभापती
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा