मुंबई | एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट ‘आ’वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी सरकार नोकरभरती का करत नाही असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जातो आहे. यापर्श्वभुमीवर
डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आँफ इंडिया आणि स्टुडंटस् फेडरेशन आँफ इंडिया’ या संघटना आंदोलन पुकारले आहे. दिनांक ३० सप्टेंबर २०१८ रोजी राज्यभरात “मानवी साखळी” आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.
आज भारतात तीन कोटींहून अधिक युवक बेरोजगारीचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमधे एकुण २४ लाख जागा खाली आहेत. सरकराने सर्व खात्यांतील रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, बेरोजगारीवर ठोस पर्याय शोधून तो आमलात आणावा तसेच शिक्षणाचे बाजारीकरणाला आळा घालावा अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.
हाती आलेल्या माहीतीनुसार शासनाच्या नागरी आणि सशस्त्र पोलीस दलांमध्ये साडेचार लाख पदं रिक्त आहेत. यातील कुठल्याच पदांसाठी सरकारने अजूनतरी नोकरभरती केलेली नाही. न्यायालयांमध्ये ५,८५३ जागा, अंगणवाडी सेविकांच्या २लाख जागा आणि टपाल खात्यामध्ये ५४ हजार जागा रिक्त असल्याचीही माहिती समोर आली आहे. संसदेत सरकारकडून वेळोवेळी दिल्या गेलेल्या माहितीचे संकलन केल्यावर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यातील सर्वाधिक जागा शिक्षणक्षेत्रातल्या असून प्राथमिक शिक्षकांच्या ९ लाख जागा रिक्त आहे.
संरक्षण खात्यातही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. सशस्त्र सैन्यदलात ६२ हजार तर पॅरामिलिटरीत ६१हजार जागा रिक्त आहेत. दरम्यान रेल्वेमध्ये अडीच लाख जागा रिक्त असून यातील बहुसंख्य जागांच्या नोकरभरतीसाठी नुकतीच रेल्वेने नोटीस जाहीर केली आहे. या महत्त्वाच्या खात्यांशिवाय इतरही खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असून नोकरभरतीचा मात्र पत्ता नाही.
या अगोदर “विद्यार्थी-युवा जागर” जत्थ्याच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षणाचे बाजारीकरण आणि बेरोजगारी विरोधात जनजागृती केली होती. मानवी साखऴी आंदोलनानंतर सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्धार या संघटनांनी केला आहे.