लाच प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाची चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कंपनीतील कामगाराच्या खिशात पन्नास रुपयांचा गांजा आढळला होता.यावेळी मजूर ठेकेदाराकडून साठ हजाराची लाच स्विकारलेल्या जमादाराला एसीबीने 1 जून रोजी रंगेहाथ पकडले होते. या घटनेनंतर वचपा काढण्यासाठी तब्बल सात दिवसांनी ठेकेदाराकडे काम करणा-या कामगारावर एमआयडीसी वाळुज पोलिसांनी गांजा प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त दीपक गि-हे हे करत आहेत. एमआयडीसी वाळुज परिसरातील यशश्री प्रेस कॉम्प्लेक्स कंपनीच्या ठेकेदारामार्फत दीपक खैरनार हा कामाला आहे. कंपनीतील अंगझडतीत त्याच्या खिशात गांजाची पुडी आढळल्याची तक्रार अर्ज कंपनीने एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात दिला होता. या तक्रारी अर्जावरुन कामगार ठेकेदाराकडे सुरूवातीला कारवाई न करण्यासाठी एक लाखांची मागणी करण्यात आली होती. यानंतर आणखी 50 हजारांची भर पडली होती. एकुण दीड लाखांची मागणी होत असल्यामुळे वैतागलेल्या कामगार ठेकेदाराने एसीबीकडे धाव घेतली होती.

त्यावरुन सापळा रचत एसीबीने जमादार गणेश अंतरप याला 60 हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी रंगेहाथ पकडले होते. तर उपनिरीक्षक सतीश पंडीत संशयाच्या भोव-यात आहेत. मात्र, यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत हे देखील संशयाच्या भोव-यात आहेत. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिलेल्या आदेशाने विभागीय चौकशी होईपर्यंत उपनिरीक्षक सतीश पंडीत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पण वरिष्ठ निरीक्षक सावंत यांच्यावर खात्याअंतर्गत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

एसीबीच्या कारवाईनंतर सात दिवसांनी म्हणजे 3 जून रोजी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या तक्रारीवरुन कामगार दीपक खैरनारविरुध्द गुन्हा रजिस्टर क्रमांक 624/2021 कलम 8 (क) 20 (ब) 2 (अ) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 नुसार यावरुन रात्री सव्वाअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. कोणत्याही अधिकारी, कर्मचा-यावर ठपका ठेवण्यात आला असेल, चौकशी सुरु असल्यास त्याची अकार्यकारी शाखेत बदली केली जाते. याप्रकरणात उपनिरीक्षकाची बदली आणि जमादाराला निलंबित करण्यात आले आहे. परंतू वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Leave a Comment