नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागिल दोन दिवसात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव च्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमकी किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर येईल त्यानंतर मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील असे स्पष्ट करीत नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

ढगफुटी सदृश्य पावसामुळे कन्नड , सोयगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल पाहणी करून येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंग चव्हाण,माजी आमदार नितीन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे , केतन काजे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वरकड आदी अधिकारी उपस्थित होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाने सज्ज राहून खबरदारी घ्यावी , कन्नड घाटातील कोसळलेल्या दरड हटवून या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करावी, सिंचन प्रकल्पाच्या झालेल्या नुकसानीच्या दुरुस्ती साठी तात्काळ प्रस्ताव सादर करावे, अतिवृष्टी झालेल्या मंडळात आरोग्य विभागाने देखील दक्ष राहण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या अतिवृष्टी मध्ये कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटून येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पाहणी दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भिलदरी गाव ते भिलदरी तलाव असा जवळपास 5 किलोमीटर दुचाकीने प्रवास करत पाहणी केली. भिलदरी तलावाचे झालेल्या नुकसणीची दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ पंचनामे करावे यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

Leave a Comment