सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
दक्षिण अमेरिका कोलंबिया येथे 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान अंडर-20 वर्ल्ड ॲथलेटिक ज्युनियर चॉम्पियनशिप 2022 या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी पंजाब पटीयाला येथे भारतातील खेळाडूंची अंतिम निवड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकर हिचीही निवड करण्यात आली आहे. तिने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 11. 84 सेकंद आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 24.19 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
मागील महिन्यात हरियाणा येथे खेलो इंडीया स्पर्धा पार पडल्या. यावेळी 100 मीटर, 200 मीटर आणि 4×100 मीटर रिले या तिन्हीही प्रकारात सुवर्ण पदक मिळवून देशात सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, देशपातळीवर मजल दरमजल करत 2018 पासून सतत सराव आणि अथक परिश्रम करत सुदेष्णा हिने आपला खेळाचा प्रवास सुरु ठेवला आहे.
एक उत्तम अशा प्रतिच्या खेळाडू असलेल्या सुदेष्णा शिवणकर हिने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. विविध स्पर्धेमध्ये कांस्य, ब्रांझ, सुवर्ण पदक मिळवत महाराष्ट्राचे नांव देशपातळीवर सुवर्ण अक्षरांनी लिहले. आज देशपातळीवरील प्रवास पुढे नेत मातृभूमीच्या सेवेची संधी तिला मिळाली आहे. कोलंबिया (दक्षिण अमेरीका) येथे होणाऱ्या अंडर 20 वर्ल्ड ज्युनियर चॉम्पियनशिप 2022 या स्पर्धेसाठी सुदेष्णा 100 आणि 200 मीटर धावणे क्रिडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.