कोल्हापूर प्रतिनिधी । शासकीय भागभांडवला सह शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ची रक्कम न दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखून धरला आहे. यातील बहुतांशी कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षातील एफआरपीची रक्कम दिलेली नाही. यामध्ये हलकर्णी मधील दौलत , हमीदवाडा मधील मंडलिक यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. तर विभागातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला नसल्याची माहिती समोर आली. यामध्ये कोल्हापूर मधील दोन आणि सांगलीतील तीन कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या दोन्ही जिल्ह्यातून 38 कारखान्यांनी हंगाम घेतला होता. मात्र यावर्षी सांगली जिल्ह्यातील किमान तीन ते चार कारखाने सुरू होणार नसल्याचे वास्तव आहे.
दरम्यान प्रलंबित असलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचा उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना, रिलायबल शुगर अँड डिस्टिलरी, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, गडहिंग्लज साखर कारखाना, दौलत सहकारी साखर कारखाना, कुंभी कासारी साखर कारखाना, केन ऍग्रो एनर्जी, वारणा साखर कारखाना, आजरा साखर कारखाना, महाकाली साखर कारखाना तर सांगलीतील यशवंत शुगर अँड पॉवर प्रा. लि, राजारामबापू पाटील साखर कारखाना, माणगंगा साखर कारखाना यांचा समावेश आहे.