राज्यात साखर उत्पादनात तब्बल 20 टक्क्यांनी घट; उसाच्या टंचाईमुळे कारखाने बंद; नेमके कारण काय?

0
2
Sugar production
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र (Maharashtra) यंदा गळीत हंगामाच्या अखेरीस साखर उत्पादनात (Sugar Production) मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. ऊस उत्पादनातील घसरण, साखरेचा कमी झालेला रिकव्हरी दर आणि इथेनॉल उत्पादनाकडे झुकलेला कल यामुळे चालू हंगामात राज्यातील साखर उत्पादन जवळपास 20 टक्क्यांनी कमी झाले आहे. यामध्ये उसाच्या टंचाईमुळे तर राज्यातील 92 कारखान्यांचे कामकाज बंद पडले आहे.

गेल्या हंगामाच्या तुलनेत मोठी घसरण

महाराष्ट्र साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, 3 मार्चपर्यंत राज्यात सुमारे 76.11 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या कमी आहे. आतापर्यंत 812.17 लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. मागील हंगामात याच कालावधीत 947.78 लाख टन ऊस गाळप झाला होता. याचा थेट परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला आहे.

92 साखर कारखान्यांना काम बंद

ऊसाची उपलब्धता कमी झाल्यामुळे राज्यातील तब्बल 92 साखर कारखान्यांनी आपले कामकाज थांबवले आहे. हे प्रमाण मागील हंगामाच्या तुलनेत मोठे आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत फक्त 36 कारखान्यांनी गाळप थांबवले होते.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कारखाने बंद?

सोलापूर – 40 गिरण्या बंद
कोल्हापूर – 16 गिरण्या बंद
पुणे – 10 गिरण्या बंद
नांदेड – 10 गिरण्या बंद
छत्रपती संभाजीनगर – 10 गिरण्या बंद
अहिल्यानगर परिसर – 6 गिरण्या बंद

देशभरातील साखर उत्पादनावर परिणाम

महाराष्ट्रातील उत्पादन घटल्यामुळे देशाच्या एकूण साखर उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) नुसार, 2024-25 हंगामात देशातील साखर उत्पादन 15 टक्क्यांनी घटणार आहे. यंदा अंदाजे 272 लाख टन साखर उत्पादन होईल, जो 2023-24 च्या 320 लाख टनांच्या तुलनेत कमी आहे. दरवर्षी भारतात सुमारे 280 लाख टन साखरेचा वापर होतो, त्यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, साखर उत्पादन घटल्याने सरकार आणि उद्योगांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. ऊस शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, साखरेच्या किंमती स्थिर राहाव्यात आणि इथेनॉल उत्पादन व साखर उद्योगाचा समतोल राखला जावा, यासाठी सरकारने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे.