धक्कादायक !!! महापालिका अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी कर्मचारी बाबू किसन करमळकर याचे भाऊ अभिजित किसन करमळकर (रा. खणभाग, सांगली) यांनी महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे व रघुवीर (काका) हलवाई यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, पाणीपुरवठा विभागात काम करणारे माझे बंधू हे गेल्या तीन ते चार दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. याबाबत त्यांना कुटुंबीयांनी वारंवार विचारणा केली. यावेळी त्यांनी रघुवीर हलवाई व राहुल रोकडे मला कामाबाबत विनाकारण मानसिक त्रास देऊन माझ्याकडून हफ्त्याची मागणी करतात. पैसे न दिल्यास पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देतात, असे त्यांनी घरी सांगितले होते. या दोघांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करणार आहे, असेही ते घरी म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी अंकलीजवळ विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवत ती त्यांच्या मित्रांच्या व्हॉट्सॲपवरही पाठवली होती. त्यामुळे माझ्या भावास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोघांवर कायदेशीर कारवाई करावी, असे अभिजित करमळकर यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. करमळकर याने अंकली गावाच्या हद्दीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सांगली ग्रामीण पाेलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या करमळकर याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी पोलिसांनी रुग्णालयात जात त्याची प्राथमिक चौकशी केली. मात्र, अद्यापही तब्येत ठीक नसल्याने पोलीस त्याच्याकडून येत्या दोन दिवसांत पुन्हा माहिती घेणार आहेत.