औरंगाबाद – अभ्यासाच्या तणावातून दहावीत शिकणार्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ते शनिवार रात्री दरम्यान घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निखिल लोळगे (16, रा. सिडको) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
या प्रकरणी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान त्याची आई उठवण्यासाठी गेली असता, त्याने साडी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याला त्याच अवस्थेत घरातील व्यक्तींनी तात्काळ खाली उतरून घाटी रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. निखिल चे वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. दहावी असल्यामुळे घरातील व्यक्तींचे निखिलच्या अभ्यासाकडे लक्ष होते, ते सतत त्याच्याशी अभ्यासाविषयी बोलत होते.
निखिल ने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने ‘माझे दहावीचे वर्ष आहे, माझे अभ्यासात प्रगती नाही. केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, पाठांतर करता येत नाही, प्रत्येक जण अभ्यासाविषयी बोलतो. वर्गात मुले हसतात. मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही.’ असे त्यांनी लिहिल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर निखिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संबंधी अधिक तपास पोलिस कर्मचारी ध्रुवराज गोरडे करीत आहेत.