औरंगाबाद : पाच लहान मुले असून देखील आई- वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संतोष कडू पाडळे (वय 38), संगीत संतोष पडले (वय 32) असे मृत पती पत्नीचे नाव आहे. नेहमीच्या कौटुंबिक भांडणाला कंटाळून ही आत्महत्या केली असल्याचे समजत आहे. ही सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव या ठिकाणी घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी कि, नेहमीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून माहेरी निघालेल्या बायकोने नवऱ्यासमोर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तर पत्नीने आत्महत्या केली म्हणून आपले काही खरे नाही असे समजून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पडळे दांपत्याला चार मुली व एक मुलगा आहे. ते शेती करून आपले कुटुंब चालवत असत.
मात्र, शुल्लक कारणावरून त्यांच्यात मागील काही वर्षांपासून कुरबुर सुरु होती. बुधवारी दोघांचे भांडण झाले. त्याच्या रागात संगीता आपल्या माहेरी पायी निघाल्या. पतीने आपल्या घरी चल असे म्हणत संगीताची समजूत काढली. सिल्लोड तालुक्यातील ते खंडाळा रस्त्यावर दोघांचे भांडण झाले. तेव्हा संगीताने पती व मुला समोर विहिरीत उडी मारली. संगीताचा जीव वाचण्या ऐवजी पती संतोष याने तिथून पळ काढला व घरी जाऊन स्वतः देखील आत्महत्या केली. दरम्यान, त्या पाच मुलांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.