सातार्‍याचा जवान सुजित किर्दत चीनच्या सीमेवर शहीद; वडील सैन्यातून सुभेदार पदावरुन सेवानिवृत्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सिक्कीम येथे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना इंजिनिअरिंग रेजिमेंटमधील हवालदार सुजित नवनाथ किर्दत (वय ३७, मूळ रा.चिंचणेर निंब ता. सातारा) हे जवान हुतात्मा झाले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने या घटनेला दुजोरा दिला आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र दुर्घटनेचा तपशील समजू शकला नाही.

जवान किर्दत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी तसेच वडील असा परिवार आहे. जवान सुजित यांचे वडील नवनाथ हे सैन्यातून सुभेदार पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. तर थोरला भाऊ बाम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत आहे.

दोनच महिन्यांपूर्वी रजा संपवून सुजित कर्तव्यावर हजर झाले होते. रविवारी सिक्कीम येथील दुर्घटनेत त्यांचा मृत्यु झाला. हवालदार सुजित किर्दत यांचे पार्थिव उद्या (मंगळवार) चिंचणेर येथे दाखल होईल, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी गावात पोहचले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यापासून गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment