औरंगाबाद । शहरातील तापमान मार्चच्या अखेरीस चांगलेच तापले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतच्या उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची रविवारी चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली.
गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. तापमानाच्या पाऱ्याची आता ४० अंशाकडे वाटचाल सुरू आहे. वातावरणातील बदलामुळे सकाळी ९ वाजेपासूनच ऊन तापण्यास सुरुवात होत आहे. दुपारी १२ ते ४ यादरम्यान उन्हाचे चांगलेच चटके जाणवत आहेत. सायंकाळी देखील आता वातावरणात उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पंख्यांचा वापर वाढला आहे. शिवाय अडगळीत पडलेले कूलरही बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून शहराच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती; परंतु काही दिवस ढगाळ वातावरणाने तापमान कमी झाले होते. मात्र, आता महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता अधिक वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३१ मार्चपर्यंत उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group