…म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही गावसकरांनी केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर हे टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते एवढे मोठे खेळाडू असूनदेखील त्यांनी कधीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही. 90 च्या दशकातील अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळली. यामध्ये संदीप पाटील, अंशुमन गायकवाड, कपिल देव यांचा समावेश आहे. पण आपण प्रशिक्षक का झालो नाही, याबाबत गावसकरांनी आता खुलासा केला आहे.

काय म्हणाले सुनील गावसकर
‘कोच म्हणून मी योग्य व्यक्ती नाही, कारण कोच किंवा सिलेक्टर होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉल पाहावा लागतो. मी तुकड्या तुकड्यांमध्ये मॅच बघतो. जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरही मी पूर्ण मॅच बघायचो नाही. थोडा वेळ मॅच बघितल्यानंतर मी पुस्तक वाचायला किंवा आलेल्या पत्रांना उत्तर देण्यासाठी जायचो. मी कधीही गुंडप्पा विश्वनाथ किंवा माझे मामा माधव मंत्री यांच्यासारखा मॅचचा प्रत्येक बॉल बघायचो नाही,’ असा खुलासा सुनील गावसकर यांनी केला आहे.

गावसकर टीमचे प्रशिक्षक झाले नसले तरी ते खेळाडूंना उपयोगी असा सल्ला नेहमीच द्यायचे. पण सध्या ते खेळाडूंना बॅटिंग टिप्स देताना दिसत नाहीत. जेव्हा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड टीममध्ये होते, तेव्हा गावसकर त्यांना नेहमीच बॅटिंगबाबत काही गोष्टी सांगत असायचे. सचिन आणि द्रविड यांनीदेखील याबाबत अनेकवेळा सांगितले आहे. ‘जुन्या टीम इंडियाचे खेळाडू माझ्याकडे यायचे, खासकरून सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण आणि सेहवाग. या खेळाडूंनी अनेकवेळा माझ्यासोबत चर्चा केली. मला त्यांच्याशी खेळाबाबत बोलायला आवडायचे. त्यांच्या खेळाबद्दल मला जे वाटायचं ते मी त्यांना सांगायचो. कदाचित माझ्या सल्ल्याचा त्यांना फायदा झाला असेल, पण मी पूर्णवेळ टीमचं कोचिंग करू शकत नाही,’ असे वक्तव्य गावसकरांनी केले होते.

Leave a Comment