हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र काँग्रेस मध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष पदी महाविकास आघाडी सरकारमधील दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची निवड होण्याची शक्यता आहे.विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी सुनील केदार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे.
काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचीही नावं होती. मात्र सुनील केदार यांच्या खांद्यावर राहुल गांधी जबाबदारी टाकण्याची चिन्हं आहेत. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जानेवारी महिन्यात निवड होण्याचे संकेत आहेत. राहुल गांधी यांच्या नवीन टीममध्ये युवकांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे. त्याआधी सुनील केदार यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत समन्वयाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली होती. मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहत होते.
सुनील केदार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. सुनील केदार नागपुरातील सावनेर मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडाआणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा आहे. सुनील केदार यांच्याकडे वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’