शेतकरी कर्जमाफी, बेघरांना घरकुल, चोवीस तास वीज या मुद्द्यांवर विशेष भर
गोंदिया प्रतिनिधी
केंद्र आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी, चौवीस तास वीज, मजुरांना कामगारांचा दर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प सुध्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्याचे काम केले गेले. भाजप सरकारच्या काळातच सर्वाधिक जनहितार्थ निर्णय घेण्यात आल्याचा दावा ऊर्जामंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
भाजप सेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारी गोंदिया येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे नेते डॉ. दीपक सावंत, खा.डॉ.विकास महात्मे, आ.डॉ.परिणय फुके व इतर सहकारी उपस्थित होते.
राजकुमार बडोले म्हणाले, युती सरकारच्या काळातच या दोन्ही जिल्हाचा खऱ्या अर्थाने सर्वांगिन विकास झाला आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू केल्याने यातील गैरप्रकाराला आळा बसला. तर झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प सुध्दा आता मार्गी लावला जात असल्याचे सांगितले. परिणय फुके म्हणाले, काँग्रेसला जे काम मागील ७० वर्षांत करता आले नाही ते काम भाजप सरकाने केवळ ७० दिवसात पूर्ण केले. नझुल पट्टेधारकांना मालकीे हक्क पट्टे मिळवून देण्याचे व भूमीधारीचे भूमीस्वामी करुन सातबारा उपलब्ध करुन देण्याचे महत्त्वपूर्ण काम भाजप सरकारने केल्याचे ते म्हणाले.