‘हे’ कारण देत सुप्रीम कोर्टाने मोहरम मिरवणुकींना परवानगी देण्याची याचिका फेटाळली

नवी दिल्ली । मोहरम मिरवणुकींना परवानगी देण्याची याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करण्यावर बंधन आली असून, मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जनतेच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नाही, असं कारण देत मोहरम मिरवणुकींना परवानगी नाकारली आहे.

मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका लखनौ येथील याचिककर्त्यांनं केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला. न्यायालय म्हणाले,”जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे,” असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने मुंबईतील जैन मंदिर पर्यूषण काळात शेवटच्या दोन दिवशी (२२ आणि २३ ऑगस्ट) सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने यावेळी जैन मंदिरांना परवानगी देतांना हे उदाहरण महाराष्ट्रात गणेशोत्सव किंवा इतर सणांना परवानगी मागणीसाठी वापरलं जाऊ नये असंही म्हटलं होत. याशिवाय गेल्या महिन्यात भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रथ यात्रेला परवानगी देताना नियम व अटी घातल्या होत्या. कोरोनामुळे देशभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक वार्षिक कार्यक्रमांबरोबर धार्मिक सण उत्सवांवरही सरकारकडून कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन बंधनं आणण्यात आली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”