नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आज दंठ ठोठावला. १ रुपया इतका हा दंड आहे. हा दंड १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास त्यांना ३ महिन्याच्या तुरुंगावासाबरोबरच ३ वर्षांपर्यंत वकिली करण्यावर बंदी घातली जाईल असे सुप्रीम कोर्ट म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली आहे. यापू्र्वी कोर्टाने २५ ऑगस्टला त्यांना ठोठवायच्या शिक्षेबाबत आपला निर्णय राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याला प्रसिद्धी दिल्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली, असे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वातील न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठाने म्हटले आहे. भूषण यांनी उचललेले पाऊल चुकीचे असल्याचे कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्विटची दखल घेत सुप्रीम कोर्टाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती. तसंच सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट केलं होतं. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दोन ट्वीटबद्दल भूषण यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं होतं.
In the event of default, he may be sent to prison for three months and may be debarred from practicing for three years #SupremeCourt #ContemptOfCourt #PrashantBhushan #PrashantBhushanCase #JusticeMishra @pbhushan1
— Bar & Bench (@barandbench) August 31, 2020
या ट्विटमुळे लोकशाहीचे खांब कमकुवत होत असल्याचं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. १४ ऑगस्ट रोजी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. दरम्यान, कोर्टाने २५ ऑगस्टच्या सुनावणीत त्यांना ठोठवायच्या शिक्षेबाबत आपला निर्णय राखून ठेवला होता या निकालावर भूषण यांनी, न्यायालयाने दिलेली शिक्षा मी भोगण्यास तयार असल्याचे निवेदन न्यायालयात केलं होतं. या विधानाचा फेरविचार करण्याची सूचना न्यायालयाने केली होती. प्रशांत भूषण यांना शिक्षा ठोठावण्याच्या मुद्द्यावर कोर्टाने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचा सल्ला मागितला होता. त्यावर प्रशांत भूषण यांना समज देऊन सोडून दिले पाहिजे, असे वेणुगोपाळ यांनी म्हटले होते. या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला होता. ट्विट करत त्यांनी आपली ही भूमिका जाहीर केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.