हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना थेट इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या प्रवक्त्यासमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली. या बैठकीत सुप्रिया सुळेंनी पुढील रणनितीबाबत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले आहे. एकनाथ शिंदेंवर जास्त टीका करू नका, त्यांच्याबाबत सौम्य भूमिका घ्या आपलं मुख्य टार्गेट देवेंद्र फडणवीस हेच आहेत असेही सुप्रिया सुळे या बैठकीत म्हणाल्या. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.
सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात सक्रिय – Supriya Sule
लोकसभे निवडणुकीतील घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेच्या तयारीला लागला आहे. एकीकडे शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत अनेक बडे नेते आपल्या गळाला लावत आहेत तर दुसरीकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) सुद्धा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक सुप्रिया सुळे यांनी बोलावली होती. या बैठकीत शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही अशी टॅग लाईन देत आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत अशा सूचना प्रवक्त्याना देण्यात आल्या, तसेच मनोज जरांगेवर कोणीही टीका करु नये असेही आदेश सुप्रिया सुळे यांनी दिले. एवढच नव्हे तर अजित पवारांना कोणतीही सहानभूती न घेता त्यांच्यावर आक्रमक होण्याच्या सूचनाही सुप्रिया सुळे यांनी दिल्यात.
शिंदेंना सॉफ्ट कॉर्नर?
दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडीतील मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची मागणी शरद पवारांनी धुडकावून लावल्यानंतर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंबाबत (Eknath Shinde) सौम्य भूमिका घेतल्याने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची गेल्या महिन्यात दोनदा बैठक झाली. यापैकी एका बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पावरही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी कंपनीला मिळाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या विरोध केला होता, मात्र असं असूनही धारावी प्रकल्पाबाबत शरद पवार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची राजकीय चर्चा रंगली आहे.