सुनिल शेवरे, स्थानिक वार्ताहर
पुणे | देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा सलग चौदा वर्ष सांभळत नेहरुंनी अठरा अठरा तास काम केले. विविध विचारप्रवाह उदयाला येत असताना जवाहर नेहरुंनी देश अखंड ठेवला म्हणुन नेहरु श्रेष्ठ ठरतात असे उद्गार जेष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी नेहरुंबद्दल बोलताना काढले. साधना साप्ताहिकाने आयोजित केलेल्या यदुनाथ थत्ते स्मृतीव्याख्यानमालेत ते बोलत होते.
१९४२ चं आंदोलन सुरु होतं, दुसरीकडे दुसऱ्या महायुद्धाची ठीणगी पेटली होती, सुभाषबाबू आणि नेहरूंचे काही प्रमाणात मतभेद जरी असले तरीही टोकाचे मनभेद नव्हते, सुभाष माझ्या लहानभावासारखा आहे, मी जर साम्यवादी विचारांच्या जवळ असतो तर मी सुभाष चा अनुयायी झालो असतो असे नेहरुंनी म्हटले होते असे मत यावेळी सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. नेहरुना लोकशाही हवी होती तर सुभाषबाबुना स्वातंत्र्यनंतर १० वर्षे साम्यवादी हुकुमशाही पद्धती हवी होती असेही ते यावेळी म्हणाले. तसेच जवाहरलाल नेहरुंनी तब्बल १४ वर्षे निस्वार्थपणे १८ – १८ तास काम केले, विविध विचारप्रवाहांना वाट करुन देताना नेहरूंनी देश अखंड ठेवला. स्वातंत्र्यानंतर देशाचे अखंडत्व टिकवण्यामधे नेहरु यशस्वी झाले म्हणून नेहरु श्रेष्ठ ठरतात असे गौरोदगार सुरेश द्वादशीवार यांनी यावेळी काढले.
यदुनाथ मोठ्या पठडीतला माणुस परंतु आपण त्याची तितकी कदर करु शकलो नाही अशी खंत ही द्वादशीवार यांनी यावेळी व्यक्त केली. यदुनाथ यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या घरी गेलो असताना पुस्तकांनी भरलेले घर पाहून आपण कसे आश्चर्यचकीत झालो होतो याची आठवण ही त्यांनी यावेळी सांगीतली. पुढे दरवर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यास सर्वानी सढळ हातांनी साधना ला मदत करावे असे आवहन यावेळी करण्यात आले.