मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयनं केलेल्या निवेदनाचा हवाला देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. जवळपास महिनाभराच्या तपासानंतर सीबीआयनं आज या संदर्भात अधिकृत निवेदन दिलं आहे. ‘सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे,’ असं सीबीआयनं म्हटलं आहे.
सीबीआयच्या याच निवेदनाचा आधार घेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपसह मुंबई पोलिसांच्या टीकाकारांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘मुंबई पोलीस दल हे जगात नावाजलेले दल आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील पोलिसांनी देशाला वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावली होती. अशा पोलीस दलाचा अपमान करणाऱ्या व त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर आहे,’ असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Proud of @MumbaiPolice
It's a befitting answer to those who insulted & questioned the integrity of Mumbai police, a force which is applauded worldwide and which sacrificed it's jawans for saving our nation during 26/11 https://t.co/2Z39WbvcjQ— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 28, 2020
सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त भाजपसह बॉलिवूडमधील काही नटनट्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं देण्याची मागणी केली होती. यापैकी काही मंडळींनी थेट मुंबई पोलिसांवर प्रकरण दाबण्यापासून नाही नाही ते आरोप केले होते. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मुंबई पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, असं राज्य सरकारचं म्हणणं होतं. मात्र, ते मान्य न करता काहींनी थेट कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.