हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या भेटीबाबत तर तर्क-वितर्क जात आहे. तर दुसऱ्या बाजूला, फडणवीस आणि ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीवरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीका केली आहे.
सध्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत चर्चा सुरू आहे. या भेटीबाबत स्पष्टीकरण देत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, मी त्यांच्या घरी भेट द्यायला येईन. त्यामुळेच आज त्यांना भेटलो, गप्पा मारल्या, नाश्ता केला आणि निघून आलो,”
सुषमा अंधारे यांची टीका
तसेच सुषमा अंधारे यांनी टीका करत म्हटले की, “राज ठाकरे यांचा राजकीय प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा फरक पडणार नाही,” त्याचबरोबर, “राज ठाकरे हे सतत भूमिका बदलतात. भाजपविरोधात बोलतात, मात्र निवडणुका जवळ आल्या की ते पुन्हा भाजपसमर्थक होतात. त्यामुळे त्यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही,” असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना मनसेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या भेटीला फक्त सौजन्यभेट म्हणूनच संबोधले आहे. तसेच, “ही कोणतीही राजकीय बैठक नव्हती. दोन्ही नेत्यांमध्ये केवळ व्यक्तिगत चर्चा झाली,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही भेट राजकीय वर्तुळाचे समीकरण बदलणारे ठरेल का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.