वाई | लाच घेतल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर भारतीय जनता पक्षातून निवडूण आलेल्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला आहे. यापुढील सहा वर्षांसाठी पालिका सदस्य किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्रधिकरणाच्या सदस्य होण्यास त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
यासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. डॉ. प्रतिभा शिंदे या सन 2016 पासून नगराध्यक्षपदावर कार्यरत आहेत. शहरातील शौचालयाच्या बांधकामांचे देयक काढण्याच्या मोबदल्यात 14 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती त्यांचे पतीमार्फत स्वीकारल्यामुळे नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती यांच्याविरुद्ध 1 जून 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पालिकेतील 16 नगरसेवकांनी त्यांना पदावरून कमी करण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती. त्याची सुनावणी 20 ऑगस्ट 2020 आणि 30 सप्टेंबर 2020 रोजी झाली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1665 चे कलम 53 (अ) आणि 55 (ब) नुसार वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आल्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढला आहे. त्याची प्रत नगराध्यक्षा डॉ. शिंदे व जिल्हाधिकारी सातारा यांना पाठविली आहे.