निलंबनाची टांगती तलवार; वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

औरंगाबाद – राज्य शासनाने संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. कर्मचार्‍यांवर सेवा समाप्ती निलंबन अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या कारवाईची जास्ती घेतली असून अशा परिस्थितीत गंगापूर आगारातील एका वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कैलास विश्वनाथ तुपे (49, रा. भेंडाळा, ता. गंगापूर) असे या वाहकाचे नाव आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गंगापूर आगारातील 9 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून त्यापैकी 5 कर्मचाऱ्यांना 28 नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले. आता माझ्यावरसुद्धा कारवाई होईल अशी धास्ती गंगापूर आगारातील वाहक कैलास तुपे यांनी घेतली होती.

त्यातच तुपे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी औरंगाबादला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज 29 नोव्हेंबर रोजी तुपे यांचे निधन झाले. या घटनेमुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये प्रशासनाविरोधात रोष वाढतच आहे. वाहक कैलास तुपे गेल्या काही दिवसांपासून काम बंद असल्यामुळे अस्वस्थ होते. ते कर्जबाजारी देखील झाले होते. तसेच एसटी प्रशासनाकडून आपल्यावरही निलंबनाची कारवाई होईल अशी भीती त्यांना वाटत होती. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.