भानामतीच्या संशयातून सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांसह 7 जणांना खांबाला बांधून मारहाण

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून 7 जणांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. ही मारहाण इतकी भीषण होती की पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध आणि महिलांना मारहाण करण्यात आली आहे. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द या गावात ही घटना घडली आहे. गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत गावातील नागरिक सहभागी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पीडितांमध्ये साहेबराव उके, शिवराज कांबळे,एकनाथ उके, शांताबाई कांबळे, धम्माशीला उके,पंचफुला उके, प्रयागबाई उके यांचा समावेश आहे.पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पीडितांची सोडवणूक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण बारा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

You might also like