घातपाताचा संशय : कृष्णा नदीपात्रात मच्छिमारांना सापडला पोत्यात मृतदेह

कराड | कराड तालुक्यातील मालखेड येथे मारकडेश्वर घाट परिसरात बुधवारी दि. 17 रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास पोत्यात बांधलेला पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. कृष्णा नदीपात्रात पोत्यातील मृतदेह मच्छिमारांना आढळून आला.

मालखेड येथील कृष्णा नदीत दोन ते तीन पोत्यात बांधून मृतदेह नदीत टाकला असा संशय व्यक्त करण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोत्यातील पुरूषासोबत घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या दृष्टीने पोलिसांच्या तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत. 15 ते 20 दिवसापूर्वी मृतदेह पोत्यात भरला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

कराड तालुक्यातील मालखेड येथे बुधवारी काही मासेमारी करणारे नदीपात्रात होते. त्यावेळी त्यांना एक पोते नदीपात्रात आढळले. संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. अपर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपअधिक्षक रणजीत पाटील, सहाय्यक निरिक्षक रेखा दुधभाते, भरत पाटील, एसआय जाधव, धनंजय कोळी, सज्जन जगताप, विजय म्हेत्रे, शशिकांत घाडगे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो पुर्णतः कुजलेल्या अवस्थेत होता. कपड्यासह इतर काही बाबींवरून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू होते. हा मृत्यू संशयास्पद असून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. मालखेड येथील चंद्रकांत कोळी, संभाजी कोळी, संदीप मोहिते या स्थानिकांनी मदत केली.

You might also like