केन ऍग्रोच्या थकीत एफ.आर.पी. साठी स्वाभिमानी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

 भाजपचे विधानपरिषदेचे आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ऍग्रो या कारखान्याची २०१८-१९ या चालू गळीत हंगामातील १० कोटींची ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्यावर जाऊन बिलाची मागणी केली आहे. मात्र बिल देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. पृथ्वीराज देशमुख हे शेतकऱ्यांना दाद देत नसल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या विविध विकास कामाच्या उदघाटन समारंभात गनिमी काव्याने थकीत एफआरपी साठी दगडफेक करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी दिला आहे.

तसेच इथून पुढे शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत पृथ्वीराज देशमुख यांचे प्रत्येक कार्यक्रम उधळून लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. जिल्ह्यातील गळीत हंगाम संपून पाच ते सहा महिने उलटत आले तरी अद्याप काही कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले थकवली आहेत. त्यातील बऱ्याच कारखान्यांनी एफआरपीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही केलेला आहे. मात्र भाजपचे जिल्हा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ऍग्रो या कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांचा पहिला हप्ता दिलेला नाही. स्वाभिमानीच्यावतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आठ दिवसांत बिल देतो अस सांगण्यात आल्यानंतर रास्ता रोको रद्द करण्यात आला.

तब्बल महिना उलटून गेला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. पृथ्वीराज देशमुख यांच्या शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते सतत मुंबई मध्ये वास्तव्यास असतात. संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथून पुढे भाजपचे तसेच पृथ्वीराज देशमुख यांचे सर्व कार्यक्रम गनिमी काव्याने उधळून लावण्याचे ठरवले आहे. उद्या सांगलीत होत असलेल्या भाजपच्या विविध विकास कामांच्या उदघाटनामध्ये तसेच आमदार पृथ्वीराज देशमुख ऊपस्थित असणाऱ्या कार्यक्रमा मध्ये गनिमी काव्याने दगडफेक करणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment