कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कराड- चांदोली मार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला कराड ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. तसेच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आंदोलकांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी दिली.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी, यासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. बारावीच्या परिक्षामुळे दुपारी 12 वाजता हे आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यात कराड, सातारा, खटाव व फलटण या चार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी काहीकाळ कराड- चांदोली मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली होती.
साताऱ्यात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सेवा रस्त्यावर बसून रास्ता रोको करण्यात आला. यामुळे बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. महावितरणने शेतपंपाची बेकायदेशीर वीजबिल वसुली थांबवून शेतकऱ्यांचे बंद केलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडून द्यावे, प्रस्तावित 37 टक्के वीजदर वाढ रद्द करावी. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी 15 दिवसात उसबिल द्यावे. ऊस मजूर टोळी मुकादमंकडून होणारी फसवणूक आणि साखर कारखान्यांचे ऊस वजन काटे ऑनलाईन करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी या आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या.