कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी, यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेच्यावतीने दिली आहे. बारावीच्या परिक्षामुळे दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात कराड, सातारा, खटाव व फलटण या चार ठिकाणी चक्का जाम करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनाचे निवेदन तहसिलदार विजय पवार व कराड तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड उत्तर तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे, उत्तमराव साळुंखे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीतर्फे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम राबवली जात आहे. या शेतकऱ्यांच्या वीज तोडणी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध प्रकारे आंदोलने केलेली आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवार दि. 22/ 2/ 2023 रोजी सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्व महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरील चक्काजाम आंदोलन होणार आहे. उद्या दुपारी 12:00 वाजता पाचवड फाटा (काले) येथे चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवानंद पाटील यांनी केले आहे.