जागावाटपात ‘स्वाभिमानी’ला ५ जागा, शिरोळमधून राजू शेट्टी की सावकार मादनाईक?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसह राज्यातील पाच जागा मिळाल्या आहेत. यामुळे इच्छुकांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. शिरोळ मधून सावकर मादनाईकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर ऐन वेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानीला शिरोळ, वरूड मोर्शी, खामगाव, नंदूरबार, मिरज असे पाच मतदारसंघ मिळाले आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ आणि शाहूवाडी असे पाच मतदारसंघ मागितले होते. मात्र आघाडीतील जागा वाटपाच्या तडजोडीत त्यांच्या पदरात जिल्ह्यातील एकच जागा पडली. हातकणंगले मतदारसंघ मिळवण्यासाठी शेट्टी शेवटपर्यंत आग्रही राहिले. मात्र तेथे काँग्रेसचे राजू आवळे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. म्हणून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला.

स्वाभिमानीला सांगली जिल्ह्यातील मिरज मतदारसंघ मिळाला आहे. उर्वरित जागा विदर्भात मिळाल्या आहेत. विदर्भातही संघटनेचा विस्तार वाढला आहे. त्यातूनच वाट्याला आलेल्या सर्वच मतदारसंघात इच्छुकांची संख्याही वाढली आहे. वरूड मोर्शीतून देवेंद्र भुयार, खामगावातून कैलास फाटे, नंदूरबारमधून प्रकाश गांगुर्डे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मिरजमधून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीवर एकमत झालेले नाही. शिरोळच्या जागेवर मादनाईक यांनी तयारी केली आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजेंद्र यड्रावरकर यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र शिरोळ स्वाभिमानीला मिळाल्याने यड्रावकर यांचा आघाडीतील पत्ता कट झाला आहे. यद्रावकर आता बंडखोरी करणार का हे पाहणं रंजक ठरेल. आघाडीतर्फे मादनाईक उमदेवारी अर्ज दाखल करण्यास सज्ज आहेत. मात्र शेट्टी यांनीच येथून लढावे, असाही एक प्रवाह संघटनेत निर्माण झाला आहे. परिणामी मादनाईक की शेट्टी याबद्दल मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment