सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
‘दुधाचे दर पाडणाऱ्या सरकारचे करायचे काय? खाली मुंडं वर पाय’ अशा घोषणा देत माण तालुक्यातील ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ रस्त्यावर उतरली. यावेळी मार्डी चौकात चक्का जाम करुन आंदोलन केले. स्वाभिमानीच्या या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचितने पाठिंबा दिला.
तीव्र उन्हाळ्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली असतानाही खाजगी व सहकारी दूध संघाने दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी कमी केले आहेत. मात्र, पशुखाद्याचे दर कमी केलेले नाहीत. तसेच चाऱ्याचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे दुध उत्पादनाचा खर्च व उत्पन्न यांचे गणित जुळत नसल्याने दुध उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे दुध दर पूर्ववत करावे, अशी मागणी करत स्वाभिमानीने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
येथील शासकीय विश्रामगृहापासून घोषणाबाजी करत सर्व कार्यकर्ते मार्डी चौकात जमा झाले. यावेळी हर्षदा देशमुख- जाधव यांनी शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या दुध दराबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेवून त्वरित हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी दुधाचे दर कमी होवूनही लोकप्रतिनिधी जर अवाक्षर सुध्दा काढणार नसतील, तर यासारखी दुर्देवी बाब नाही असे मत व्यक्त करत खाजगी दुध संघाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.
चक्का जाम आंदोलनाच्या शेवटी तहसिलदार विकास अहिर यांना निवेदन देण्यात आले. माण-खटावमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दूध उत्पादक कुठे गेला?
दुध उत्पादकांचा अतिशय जिव्हाळ्याचा दुध दराचा प्रश्न घेवून स्वाभिमानी रस्त्यावर उतरली. मात्र ज्यांच्यासाठी हे आंदोलन करण्यात येत होते त्या दुध उत्पादक शेतकर्यांची अत्यल्प उपस्थिती या आंदोलनात दिसून आली. राजकारण फाट्यावर मारुन दुध उत्पादकांनी या आंदोलनात सहभागी होण्याची गरज होती. मात्र, त्यांना आपल्या जगण्याच्या प्रश्नापेक्षा राजकारण प्रिय झाल्याची चर्चा आंदोलकांच्यात सुरू होती.