परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
प्रादेशिक आर्थिक भागीदारीचा करार केंद्र सरकारने स्वीकार करू नये तसेच जिल्ह्यातील खरीप पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावी या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी परभणी गंगाखेड रस्त्यावरील जुन्या टोलनाक्याजवळ रस्ता रोको केला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देशातील शेतकरी संघटनांची मोट बांधत ग्रामीण भारत बंद ची हाक दिली होती .यात स्थानिक संघटनेच्यावतीने परभणीत बुधवार आज ८ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
.
मका, कापसासारख्या पिकांवर पडणाऱ्या रोगांमुळे राज्यातील व देशातील शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना शेतकऱ्यांसमोर प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी कराराचे (RCEP ) चे मोठे संकट उभे करण्यात येत आहे, या करारावर सह्या करण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरु असून यातून आस्ट्रेलिया, मलेशिया आणि चीन सारख्या देशातून पामतेल, दुध, केळी, तांदुळ असा शेतीमाल आयात करून देशातील शेती व्यवसाय मोडकळीस आणण्याचे कट
कारस्थान सरकार करत आहे.
या उलट दुसऱ्या देशातील तंत्रज्ञान, आधुनिक बीटी बियाणे मात्र भारतीय शेतकऱ्याच्या हाती देण्यास केंद्र शासन उदासीन धोरण राबवत आहे. असे आरोप शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात आरोप केले गेले.याशिवाय राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सरसगट सातबारा कोरा करावा व कर्ज माफी द्यावी अशीही यावेळी मागणी करण्यात आली.दरम्यान आंदोलनामुळे तब्बल २ तास वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता.