सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. महावितरणकडून खोटी बिले देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. अन्यायकारक पद्धतीने वीज कनेक्शन तोडले जात आहे. सहकार मंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले.
वीज कनेक्शन तोडणीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी एकच गट्टी, राजू शेट्टी, उसाला एकरकमी दर मिळालाच पाहिजे, ऊस आमच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा.., अशी घोषणाबाजीही कार्यकर्त्यांनी केली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, धनंजय महामुलकर, देवानंद पाटील, विजय चव्हाण, रमेश पिसाळ, नितीन यादव, दादासाहेब यादव, श्रीकांत लावंड, संदीप पवार, विकाम कदम, रवींद्र घाडगे, महादेव डोंगरे, हेमंत मोरे, हेमंत खरात, राजू घाडगे आदी उपस्थित होते.
राजू शेळके म्हणाले, कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आला आहे. दुसऱ्या बाजूला हेच मंत्री कर्जाचे हप्ते, वीजबिल भरण्यास सांगत आहेत. आरोग्य, शिक्षण यांसारखे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. महावितरण कंपनी खोटी बिले देऊन कनेक्शन कट करत आहेत. यातून शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. येत्या चार दिवसांत तोडलेली कनेक्शन जोडावीत, अन्यथा त्याचा परिणाम अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोगावा लागेल, असा इशाराही राजू शेळके यांनी केले आहे.