कराड | स्वाध्याय परिवाराचे वृक्ष संवर्धनात मोठे काम आहे. यापूर्वी स्वाध्याय परिवाराने अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे जतन केले आहे. वृक्षात देव पाहून त्याचे जतन करणे हे भगवंताचे पूजनच आहे. अशी शिकवण स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी दिली. या भावनेतूनच परिवारातील सदस्य वृक्षाचे जतन करण्यासाठी परिश्रम घेत असतात प्रतिपादन कराड येथील कोटा ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन व लायन्सचे रिजन चेअरमन डॉ. महेशकुमार खुस्पे यांनी केले.
कराड येथे स्वाध्याय परिवाराच्यावतीने टाऊन हॉलमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोटा अकॅडमीच्या संचालिका मंजिरी खुस्पे, नईम कागदी, लायन्स क्लब कराड सिटीच्या अध्यक्षा सोफिया कागदी, डॉ. शर्मिष्ठा गरूड, सुनिता पाटील, मैथिली खुस्पे, संदिप कोलते, मीना कोलते, राजश्री खराडे, स्नेहल व्हावळ, आबा यादव, कोटा अकॅडमीचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोटा अकॅडमी व लायन्स क्लब कराड सिटी यांच्यावतीने स्वाध्याय परिवाराला शेकडो रोपे भेट देण्यात आली.
महेश खुस्पे म्हणाले, झाडांकडे केवळ सौंदर्य उपभोगतेच्या दृष्टिकोनातून न पाहता भक्तीच्या दृष्टीतून पाहिले पाहिजे. पर्यावरणात प्रभू निवास करतो. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. हे काम गेले अनेक वर्ष स्वाध्याय परिवाराच्या वतीने केले जात आहे. म्हणूनच कोटा अकॅडमी व लायन्स क्लब कराड सिटीच्या वतीने स्वाध्याय परिवाराला विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे भेट देण्यात आली आहेत. स्वाध्याय परिवाराला भेट दिलेल्या रोपांची लागवड केल्यानंतर त्याचे जतन परिवाराकडून केली जाईल याची खात्री असल्यानेच त्यांना रोपे भेट देण्याचा निर्णय घेतल्याचेही डॉ . महेश खुस्पे यांनी सांगितले.